मराठा आरक्षणासाठी समाजाची वज्रमूठ; कोल्हापुरात गोलमेज परिषेदेचे आयोजन - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२०

मराठा आरक्षणासाठी समाजाची वज्रमूठ; कोल्हापुरात गोलमेज परिषेदेचे आयोजनटीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुणांसमोर अंधकार पसरला आहे. यासाठी पुन्हा एकदा समाजाची ताकद दाखविण्यासाठी वज्रमूठ बांधायची असून, २३ सप्टेंबरला कोल्हापुरात राज्यस्तरीय गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे.


यामध्ये राज्यातील ५० हून अधिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.कोरोनामुळे पुण्यात होणारी गोलमेज परिषद रद्द करावी लागली होती.


मात्र आता शासनाचे सर्व नियम पाळून २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रावजी मंगल कार्यालयात ही परिषद होणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाच्या लढाईचे रणाशिंग फुंकले जाणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.


तर खासदार, आमदारांच्या पुतळ्याचे दहन


सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी संसदेत आरक्षणाचा प्रश्न रेटून धरून कायदा करण्यास भाग पाडावे. त्याचबरोबर राज्यातील २८८ पैकी १८१ मराठा आमदार आहेत, त्यांनीही आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत तर खासदार, आमदारांच्या पुतळ्यांचे दहन करण्याचा इशारा मराठा आरक्षण समन्वय समितीचे निमंत्रक विजयसिंह महाडिक यांनी या वेळी दिला.

मराठा क्रांती मोर्चा येत्या १७ सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सुरक्षित अंतर पाळून निदर्शने करणार आहे.

लातूर येथे खा. सुधाकर शृंगारे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबरला पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील निवासस्थानासमोर तसेच अहमदपूर, उदगीर, निलंगा, औसा, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या घरांसमोर निदर्शने केली जाणार आहेत.

अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याच कार्यालयासमोर गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.


Round table conference in Kolhapur for Maratha reservation;  More than 50 organizations from across the state will participate

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा