सांगोला! बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असलेल्या भावाचा अपघातात मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १८ जुलै, २०२०

सांगोला! बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असलेल्या भावाचा अपघातात मृत्यू
टीम मंगळवेढा टाईम्स । बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असलेल्या भावांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात  एक भाऊ जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले़ दरम्यान, दुसऱ्या दुचाकीवरील तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार १७ रोजी रात्रीच्या सुमारास सांगोला - महुद रोडवरील दत्तात्रय जानकर यांच्या शेताजवळ घडला. Sangola Accidental death of a brother on his sister's birthday


नंदकुमार बाबासो पवळ (रा. बागलवाडी ता. सांगोला) व सुनील श्रीरंग सुतार रा. जैन वाडी (ता. पंढरपूर) असे ठार झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत तर अपघातातील बालाजी उर्फ रणजित बाबासो पवळ (रा. बागलवाडी) याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास मिरज येथे हलविले आहे. विक्रम आण्णासो पवळ हा किरकोळ जखमी झाला आहे या अपघातात दोन्ही दुचाकीचे मिळून सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

बागलवाडी येथील नंदकुमार बाबासो पवळ , विक्रम आण्णासो पवळ व बालाजी उर्फ रणजित बाबासाहेब पवळ असे सख्ये दोघेजण व चुलत एक असे तिघेजण मिळून एमएच १० एएच १०३२ या दुचाकीवरून संगेवाडी येथील बहिण सुमन खंडागळे हिच्या वाढदिवसानिमित्त निघाले होते.


दरम्यान सांगोला बंद असल्याने पवळ बंधूनी महुद येथून केक व शिवणे येथील माळयाकडून हार-फुले घेवून सांगोल्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान सांगोल्याकडून जैनवाडी ता. पंढरपूर येथील सुनील श्रीरंग सुतार हा एम एच १३ सीएम ४३९९ या दुचाकीवरून महूद ( जैनवाडी ) कडे निघाला होता़ दोन्हीही भरधाव दुचाकींची महूद- सांगोला रोडवरील म्हसोबा टेकाच्या पुढे दत्तात्रय जानकर यांच्या शेताजवळ समोरासमोर जोराची धडक होऊन हा अपघात घडला.
अपघातात नंदकुमार पवळ हा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला तर सुनील श्रीराम सुतार यालाही डोक्यास मार लागल्याने सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार पवार व पोलीस नाईक मंगेश पांढरे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मयत व गंभीर जखमींना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलीस नाईक मंगेश पांढरे यांनी फिर्याद दाखल केली असून तपास हवालदार नागेश निंबाळकर करीत आहे.

---------------------------

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा