गरिबांना आणखी 5 महिने धान्य मोफत मिळणार ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा - Mangalwedha Times

Breaking

Tuesday, June 30, 2020

गरिबांना आणखी 5 महिने धान्य मोफत मिळणार ; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात उदभवलेली गंभीर परिस्थिती आणि लडाखमध्ये चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण यामुळे सध्या देश चिंतीत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावाबाबत मोदी बोलतील, असा देशवासियांना अंदाज होता. मात्र, मोदींनी आपल्या भाषणात कोरोनाच्या संकटावर भाष्य केलं. प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार असल्याची घोषणा मोदींनी केली. त्यानुसार, देशातील 80 कोटी नागरिकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो चना डाळ आणखी 5 महिने मोफत मिळणार आहे.   The poor will get grain for free for another 5 months;  Prime Minister narendra Modi's big announcement


जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाविरुद्ध चांगली लढाई लढली आहे. मात्र, अद्यापही संकट टळले नसून जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात कडक नियम पाळण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत स्थानिक प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे आजही महत्त्वाचं असल्याचं मोदींनी आजच्या भाषणात म्हटलं.


केंद्र सरकारकडून लॉकडाऊन काळात 30 कोटी जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले असून 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. Pradhan Mantri Garib Kalyan Yojana प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचीही सुरुवात करण्यात आली आहे. देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचं कामही सरकारने केलं आहे. आता, Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी 5 महिने वाढविण्यात आली असून 80 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना धान्य मोफत देण्यात येणार आहे.


प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेचा विस्तार करण्यात आला असून नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि एक किलो चना डाळही मोफत मिळणार आहे. गेल्या तीन महिन्यांचा आणि आगामी 5 महिन्यांच्या मोफत धान्य योजनेचा खर्च एकूण दीड लाख कोटी रुपये एवढा असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, अद्यापही काळजी घेण्याचे आवाहन मोदींनी नागरिकांना केले आहे.

सरपंच,नगरसेवक असो किंवा पंतप्रधान नियमांपेक्षा कोणीही मोठा नाही : नरेंद्र मोदी

देशात अनलॉक २ Unlock in the country 2 सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भारतीय जनतेशी संवाद साधला. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसून यावर मात करण्यासाठी आपल्या सर्वांना अधिक सतर्कता पाळणं गरजेचं असल्याचं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. लॉकडाउनचे चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर अनलॉकच्या काळात नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढत जात असल्याची खंत पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलून दाखवली.


लॉकडाउन काळात सोशल डिस्टन्सिंग ते स्वच्छतेपर्यंतचे सर्व नियम आपण पाळत होतो. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये काही लोकं हे नियम पाळत नसल्याचं पहायला मिळतंय. काही लोकं सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालून जाणं टाळत आहेत. १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, त्याला नागरिकांनीही साथ द्यायला हवी. काही दिवसांपूर्वी एका राष्ट्राच्या नेत्याला मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. भारतातही आपल्याला अशीच परिस्थिती तयार करायची आहे. गावचा सरपंच,नगरसेवक असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.


यावेळी बोलत असताना मोदींनी पावसाळ्याच्या काळात सर्वांना तब्येतीची अधिक काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. या काळात सर्दी-खोकला, ताप अशा प्रकारचे आजार सहज बळावतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःची काळजी घेणं गरजेचं असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं. इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती बऱ्याच प्रमाणात सांभाळण्यात आलेली आहे, त्यामुळे या प्रादूर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता सरकारला साथ देणं गरजेचं असल्याचं मोदींनी सांगितलं.

---------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment