IPL : दुबई आय.पी.एल.च्या आयोजनासाठी तयार ; बी.सी.सी.आय.ला दिला प्रस्ताव - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ८ जून, २०२०

IPL : दुबई आय.पी.एल.च्या आयोजनासाठी तयार ; बी.सी.सी.आय.ला दिला प्रस्ताव


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षीची आय.पी.एल. अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यंदाच्या वर्षीचं आय.पी.एल. आता कधी आणि कुठे होणार? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पण यु.ए.ई.च्या अमिरात क्रिकेट बोर्डाने आय.पी.एल.चं आयोजन करण्याची तयारी दर्शवली आहे. आय.पी.एल.चा १३ वा मोसम मार्च महिन्यात सुरू होणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा पुढे ढकलली गेली.


गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार यु.ए.ई. क्रिकेट बोर्डाने बी.सी.सी.आय.ला आय.पी.एल.चं आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. ‘यु.ए.ई.मध्ये याआधीही आय.पी.एल.चं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं, तसंच द्विदेशीय आणि बहुराष्ट्रीय स्पर्धाही यु.ए.ई.मध्ये खेळवल्या गेल्या’, असं यु.ए.ई. बोर्डाचे महासचिव मुबाशशिर उस्मानी म्हणाले आहेत. 


इंग्लंड क्रिकेट बोर्डालाही आम्ही मोसमाच्या उरलेल्या मॅच खेळवण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. इंग्लंड आणि भारत या दोन्ही बोर्डांना आम्ही प्रस्ताव दिला आहे. दोघांपैकी कोणत्याही बोर्डाने याचा स्वीकार केला, तर आम्हाला आनंद होईल,’ अशी प्रतिक्रिया मुबाशशिर उस्मानी यांनी दिली.


याआधी श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही आय.पी.एल.च्या आयोजनासाठी आपण उत्सुक असल्याचं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-२० वर्ल्ड कप रद्द करण्यात आला, तर आय.पी.एल.चं आयोजन होईल, असं बोललं जातंय. टी-२० वर्ल्ड कपबाबत १० जूनला आय.सी.सी.ची बैठक आहे. या बैठकीमध्ये वर्ल्ड कपचं भवितव्य ठरवलं जाईल. यानंतरच आय.पी.एल.बाबत निर्णय घेण्यात येईल.


Dubai ready for IPL;  Proposal submitted to BCCI

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा