तळीरामांसाठी दारू विक्री करण्यासाठी दुकानदारांचा पुढाकार ; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ८ जून, २०२०

तळीरामांसाठी दारू विक्री करण्यासाठी दुकानदारांचा पुढाकार ; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी


टीम मंगळवेढा टाईम्स । देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील देशी-विदेशी दारूची दुकाने बंद आहेत. जवळपास तीन महिने झाले दुकाने बंद असल्याने मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तरी ही दुकाने सुरु करण्यास तात्काळ परवानगी द्यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा देशी व विदेशी मद्य विक्रेत्यांच्या वतीने सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.


दारू विक्रेत्यांनी दिलेल्या निवेदनानूसार, केंद्र सरकारने अनलॉक-१ तर राज्य सरकारने बिगिन अगेन-१ सुरु केलय. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आस्थापना सुरु झाल्या आहेत. तर काही आस्थापना टप्प्याटप्याने सुरु होणार आहेत. फक्त दारूची दुकानेच बंद आहेत. सर्व दारू दुकानदारांनी २०२०-२१ चे नूतनीकरण शुल्क भरले आहे. नुतनीकरण केल्यानंतर दारू दुकाने बंदच आहेत. त्यामुळे दुकान मालक आणि कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


तसेच शासन आदेशानुसार गेली दोन महिने दुकानातील कामगारांना पगार दिल्याचा दावा या निवेदनात करण्यात आलाय. या महिन्यात दुकाने सुरु न झाल्यास आता कामगारांचा पगार देणे ही अवघड असल्याचे दारू दुकानदारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात सध्या १५ ते २० हजार कामगार दारू दुकानात काम करत आहेत. त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची संख्या मोठी आहे. दुकाने न उघडल्यास या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
तसेच दुकानदारांनी काढलेल्या कर्जाचे हफ्ते भरणे ही मुश्किल झाले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच फेब्रुवारी मध्ये खरेदी केलेल्या बिअरची  एक्सपायरी डेट देखिल संपत आल्याने हा माल नष्ट करावा लागणार आहे. याची किंमत जवळपास पाच ते सहा कोटी आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. ठोक देशी-विदेशी दारु विक्रेत्यांचे देणे २० ते २५ कोटी आहे. यासाठी हे व्यापारी तगादा लावत आहेत. त्यामुळे आम्ही मानसिक तणावाखाली असल्याचे दारू विक्रेत्यांचे मत आहे.

तरी वरिल मुद्द्यंचा विचार करुन राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे सोलापूरात दारू विक्रीस परवानगी देण्याची मागणी अध्यक्ष सोमेश क्षीरसागर यांनी केली आहे.आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Start local and foreign liquor shops in Solapur district - Demand of Liquor Dealers Association.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा