भारत चीन संघर्ष : पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक - Mangalwedha Times

Breaking

Friday, June 19, 2020

भारत चीन संघर्ष : पंतप्रधानांची आज सर्वपक्षीय बैठक


मंगळवेढा टाईम्स टीम । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली होती. भारतातील विविध पक्षाचे प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. India -China conflict: All-party meeting of PM today

सोमवारी रात्री पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यामध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनच्या बाजूलाही मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. तसंच भारताच्या जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहितीही समोर आली आहे.

संरक्षण मंत्र्यांचीही चर्चा

सर्वपक्षीय बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखी विरोधी पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बसपाच्या अध्यक्षा मायावती यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा केल्याची माहितीही समोर आली आहे.


 तर चोख प्रत्युत्तर

गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात युद्धसदृश स्थिती निर्माण झाल्याने उभय देशांदरम्यान संबंध ताणले गेले आहेत. या संघर्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भाष्य केलं. गलवान खोऱ्यात भारतीय जवान शहीद झाल्याने अतीव दु:ख झाले आहे. त्यांनी आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना बलिदान दिलं आहे, अशा शब्दांत मोदींनी शहीद जवानांबद्दल सद्भावना व्यक्त केली होती. भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताने कधीही कोणत्याही देशाला डिवचलेले नाही, तो भारताचा स्वभावही नाही. पण, भारत अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड करणार नाही. अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करताना भारताने आधीही आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. भारताने प्रत्येक वेळी आपली ताकद दाखवून दिली आहे, असे मोदी म्हणाले होते.

देश जवानांचे बलिदान विसरणार नाही : राजनाथ सिंह

गलवान खोऱ्यात जवान शहीद झाले, ही घटना अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदनादायी आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढलेल्या या जवानांचा प्रत्येक भारतीयाला गर्व आहे. भारतीय लष्कराच्या अत्युच्च परंपरेचे प्रदर्शन करत त्यांनी देशासाठी बलिदान दिले. देश त्यांचे शौर्य आणि बलिदान कधीही विसरणार नाही, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले होते.

No comments:

Post a Comment