कर्नाटकमध्ये 20 आमदार बंडाच्या पवित्र्यात ; पुन्हा राजकीय संकट ? - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २९ मे, २०२०

कर्नाटकमध्ये 20 आमदार बंडाच्या पवित्र्यात ; पुन्हा राजकीय संकट ?


टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना संकटाच्या काळात कर्नाटकात पुन्हा राजकीय संकट उभे राहण्याच्या तयारीत आहे. भाजपाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्याविरोधात २० बंडखोर आमदारांनी मोर्चा उघडल्याचे समजते आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील कोणत्याही प्रकारची तातडीची बैठक बोलविण्य़ाचे वृत्त फेटाळले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, काही वृत्तवाहिन्यांवर तातडीची बैठक बोलावल्याचे दाखविले जात आहे. मात्र, सत्य त्यापासून खूप लांब आहे. मी अशी कोणतीही बैठक बोलावलेली नाही. मात्र, माझ्या निवासस्थानी रमेश कत्ती यांना भोजनासाठी बोलावले होते. मात्र, याचे राज्यसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी ट्विट करून स्पष्ट केले.
येडियुराप्पांमुळे नाराज असलेल्या आमदारांनी उमेश कत्ती यांना कॅबिनेट मंत्री बनविण्याची मागणी केली आहे. कत्ती हे आठवेळा आमदार राहिलेले आहेत. याशिवाय उमेश कत्ती यांचे भाऊ रमेश कत्ती यांना राज्यसभेवर पाठविण्य़ात यावे अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केली आहे. मात्र, रमेश यांच्या राज्यसभा लढविण्यावरून कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे वृत्त देण्यात येत होते.


मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी जरी राज्यसभेचे वृत्त फेटाळले असले तरीही उमेश कत्ती यांनी भेटीचे कारण जगजाहीर केले आहे. येडीयुराप्पांनी  माझ्या भावाला राज्यसभेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. याचीच आठवण करून देण्यासाठी रमेश कत्ती येडियुराप्पांना भेटण्यासाठी गेले होते, असे उमेश कत्ती म्हणाले.

काय आहे प्रकरण?

उमेश कत्ती य़ांनी २००८ मध्ये एच डी देवेगौडा यांच्या जेडीएसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्यासोबत ७ आमदार गेले होते. आता त्यांच्याकडे २० आमदार असून बेळगाव परिसरात त्यांचा लिंगायत समाजावर वरचष्मा आहे. मुख्यमंत्री येडीयुराप्पाही त्याच समाजाचे आहेत. गुरुवारी त्यांनी २० समर्थक आमदारांना भोजनासाठी बोलावले होते. मात्र, पक्षातील कोणताही नेता यावर बोलण्यास तयार नाहीय.


हे बंडखोर आमदार मुख्यमंत्र्यांविरोधात मोठे बंड करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या आमदारांनी येडीयुराप्पांवर आरोप केला आहे की, ते आमच्याशी कोणत्याच विषयावर चर्चा करत नाहीत. तसेच कोरोना संकटातही येडीयुराप्पांनी राज्याकडे लक्ष दिलेले नसल्याचा आरोप केला आहे.

Political crisis in Karnataka again?  20 MLAs in revolt against Yeddyurappa

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा