पंढरपूरमध्ये कोविड 19 रुग्णालय 65 एकर इमारतीमध्ये कराव्यात : आ.प्रशांत परिचारक - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३० मे, २०२०

पंढरपूरमध्ये कोविड 19 रुग्णालय 65 एकर इमारतीमध्ये कराव्यात : आ.प्रशांत परिचारक


समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी पंढरपूर शहराबाहेर लोकवस्तीपासून दूर 65 एकर परिसरातील इमारतीमध्ये कोविड 19 रुग्णालयाची उभारणी करणेबाबतची मागणी सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे (Guardian Minister Dattatraya bharane)यांच्याकडे केली असल्याची माहिती आ. प्रशांत परिचारक यांनी दिली.(MLA prashant paricharak)


सध्या कोरोना विषाणू महामारीमुळे देशात कोविड नियंत्रणासाठी रुग्णालय उभारणी सुरु आहे. पंढरपूर येथे कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी जागेची पाहणी करणेत येत आहे. त्यामध्ये पंढरपूर ग्रामीण सर्वोपचार केंद्र(कॉटेज),पंढरपूर येथे कोविड हॉस्पीटलची निर्मितीसाठी चर्चा होत असलेने त्या भागातील नागरिक रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शित करीत आहेत.

या कॉटेज हॉस्पीटलच्या जवळपास परिसरात अंबाबाई पटांगण, व्यासनारायण, रामबाग, आण्णाभाऊ साठे नगर, 197 ब, मेहतर कॉलनी, नगरपालिका कामगार कॉलनी, कोळी गल्ली, अनिल नगर अशा अनेक झोपडपट्टया असून या लोकवस्तीमध्ये अंदाजे 8 ते 10 हजार नागरिक वास्तव्यास आहेत. या भागातील स्थानिक रहिवासी यांचे अंदाजे 10 बाय 10,10 बाय 15 आकाराची लहानमोठी घरे असून तेथे दाटीवाटीने नागरिक रहात आहेत. त्या नागरिकांनी भविष्यात होणार्‍या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने कॉटेज हॉस्पीटल येथे कोविड 19 हॉस्पीटल निर्मितीसाठी विरोध करून सदर हॉस्पीटल इतरत्र करणेबाबत मागणी करीत आहेत. सदर मागणी रास्त असून भविष्यात कोरोनाचा संसर्ग तेथील झोपडपट्टीमध्ये पसरल्यास रोगावर नियंत्रण करणे अवघड होवू शकते.

 प्रशासनाकडून  एक ते दीड महिन्यापुर्वी कॉटेज हॉस्पीटलची पाहणी करून होत असलेल्या लहान मोठे आजार,सर्दी,ताप ,खोकला, अपघात अशा इतर उपचारासाठी शहरातील व ग्रामीण भागातील रुग्णांची नियमित सोय होत असल्याचे कारण देत या ठिकाणी कोविड रुग्णालय होवू नये असा निर्णय घेतला होता. परंतू मागील काही दिवसापुर्वी अचानक निर्णय बदलून कॉटेज हॉस्पीटल येथे कोविड रुग्णालय करणेची चर्चा चालू झाल्याचे प्रसार माध्यमातून निदर्शनास येत आहे. खाजगी दवाखाना परिसरातील व उपजिल्हा रुग्णालय परिसरातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता सदरहू कोविड 19 हॉस्पीटल उभारणीसाठी लागणारा अंदाजे रक्कम 1 कोटी रु इतका खर्च माढा व सोलापूर येथील खासदार निधी, नगरपालिका, जिल्हा नियोजन मंडळ व माझे आमदार विकास कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होवून करणे शक्य आहे असे आ.प्रशांत परिचारक यांनी म्हटले आहे.

पंढरपूर शहराबरोबर व लोकवस्ती बाहेर  कोविड 19 रुग्णालय उभारणी झाल्यास शहर आणि ग्रामीण भागातील जनतेला याचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. तसेच भविष्य काळामध्ये पंढरपूर शहरात भरणार्‍या सर्व यात्रा कालावधीमध्ये या संसर्गजन्य हॉस्पीटलचा उपयोग कॉलरा, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया अशा विविध आजारावर पंढरपूर-मंगळवेढा-सांगोला या तालुक्यातील नागरिकांकरीता  करणे सोयीचे होईल अशी मागणी आ. प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे  केली आहे. याबाबत कॉटेज हॉस्पीटल परिसरातील नागरिक, नगरसेवक यांनी आ.प्रशांत परिचारक यांचेकडे मागणी केली होती.

Kovid 19 Hospital in Pandharpur should be built in 65 acre building: MLA Prashant Paricharak

-----------------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा