कामाची बातमी : राज्यातील सर्वांना सरकारची आरोग्यदायी भेट; पहा काय आहे नवी योजना - Mangalwedha Times

Breaking

Saturday, May 2, 2020

कामाची बातमी : राज्यातील सर्वांना सरकारची आरोग्यदायी भेट; पहा काय आहे नवी योजना


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील 100 टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर केला. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केली जात आहे. तिला चाप लावण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ८५ टक्के नागरिकांना लाभ दिला जात होता.

आता उर्वरित 15 टक्के लोकसंख्येचाही ज्यामध्ये शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पांढरे शिधापत्रिकाधारक यांचाही या योजनेंतर्गत समावेश करण्यात येणार असून राज्यातील सामान्य नागरिकांच्या उपचारावरील आर्थिक खर्चाची काळजी घेणारा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी आज जाहीर केला.


मुंबई, पुण्यातील ज्या मोठ्या रुग्णालयांचे जीप्सा (जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोशिएशन) सोबत करार झाले आहेत आणि विविध आजाराच्या उपचारासाठी विविध पॅकेजेस ठरलेले आहेत. रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करतांना जे दर निश्चित आहेत त्याप्रमाणेच आकारणी करायची आहे. मग रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये का असेना त्यापेक्षा जास्त दर रुग्णालयांना आकारता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून तो खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.

मुंबई, पुण्यातील ज्या रुग्णालयांचे जीप्सासोबत करार नाहीत त्यांच्यासाठी दरसुची निश्चित करण्यात आली आहे. त्या दरसुचीपेक्षा अधिकची आकारणी मग रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये असेल ती करता येणार नाही. उपचारादरम्यान, पीपीई कीटस्, एन 95 मास्क वापरल्यास खरेदी किमतीच्या 10 टक्के दर वाढीव दर लावण्यास मुभा देण्यात आली आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील रुग्णालयांनी जे विविध थर्ड पार्टी अग्रीमेंट (टीपीए) त्यानुसार एकाच उपचारासाठी दर निश्चित केले आहेत त्यापैकी जनरल वॉर्डच्या किमान दरापेक्षा अधिकचे दर त्यांना आकारता येणार नाहीत.

जालना येथे महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या ध्वजवंदन समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. टोपे यांनी ही माहिती दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे

• मुंबईमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करताना काही खासगी रुग्णालयात वेगवेगळे दर आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी दिवसाला एक लाख रुपयांची आकारणी रुग्णालयांनी केली आहे. रुग्णालयांच्या या मनमानीला चाप लावण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार एका ठराविक दराच्या वर दर आकारणी करता येणार नाही, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे.

• महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पूर्वी 496 रुग्णालयांचा समावेश होता. आता त्यांची संख्या एक हजार झाली आहे. या योजनेमुळे 85 टक्के लोकसंख्या लाभार्थी होती आता उर्वरित 15 टक्के लोकसंख्येचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील 100 टक्के जनतेला मोफत उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ या योजनेंतर्गत समावेश असलेल्या रुग्णालयातून मिळणार आहे.

• महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये जर कोरोना रुग्णालयांचा समावेश असेल तर तेथे कोरोनाच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील.

--------------------
ब्रेकिंगनवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment