सोलापूर : संचारबंदीत भरवली देवीची यात्रा ; 53 जणांविरुद्ध गुन्हे दाखल - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 26, 2020

सोलापूर : संचारबंदीत भरवली देवीची यात्रा ; 53 जणांविरुद्ध गुन्हे दाखल


मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून सरकारने सर्व मंदिरे, उद्योग,व्यवसाय बंद केले आहेत. सर्वत्र संचारबंदी लागू केली असून पाचपेक्षा अधिक लोक एकत्र जमल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. मात्र, नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील 100 ते 150 ग्रामस्थांनी मिळून तेथील नागम्मा देवीची यात्रा साजरी केली. ही यात्रा झाल्यावर पोलिसांना माहीती समजली आणि 18 जणांना पकडून पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे.


नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या नांदणी येथील नागम्मा देवीची यात्रा दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी भरते.


मात्र, यंदा कोरोनामुळे संपूर्ण शहर-जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूर शहरात मागील 12 दिवसांत कोरोना व सारी च्या आजाराचे 50 रुग्ण सापडले असून त्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण व उत्तर सोलापुरात संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. निर्णय होऊन दोन दिवसही झाले नाहीत, तोवर नांदणीतील सुमारे 50 जणांनी एकत्रित येऊन नागम्मा देवीची यात्रा साजरी केली.


शनिवारी (ता. 25) पहाटे काही गावकऱ्यांनी चार किलोमीटर पायी जाऊन भीमा नदीत मूर्तीला स्नान घातले. त्यानंतर रविवारी (ता. 26) होमहवन संपन्न झाले.


यात्रा संपत असतानाच पोलिसांना याची खबर लागली. अटक केलेल्यांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गावच्या तलाठ्याने फिर्याद दिली आहे. संचारबंदीत यात्रा साजरी करू नका असे सांगूनही नागरिकांनी न ऐकता मला दमदाटी केली, असे तलाठ्याने फिर्यादीत नमूद केले आहे.


दरम्यान, नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, पोलिस तुमच्या सुरक्षिततेसाठीच रस्त्यांवर आहेत, असे आवाहन पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment