पुण्यात मृत्यू झालेल्या वृद्धाच्या अंत्यविधीस गावकऱ्यांनी केला विरोध - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 24, 2020

पुण्यात मृत्यू झालेल्या वृद्धाच्या अंत्यविधीस गावकऱ्यांनी केला विरोध

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । आजारपणामुळे पुण्यात ससून रुग्णालयात मृत्यू झालेल्या एका वृद्धाचा अंत्यविधी त्याच्या मूळ गावी म्हणजे सांगोला येथे स्मशानभूमीत उरकण्यास करोनाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे शेतातच अंत्यविधी उरकला गेला.


दरम्यान, पुण्यातून मृतदेह सांगोल्यात आणलेल्या दोघाजणांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. केवळ करोना फैलावाच्या सार्वत्रिक भीतीपोटी मृताच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला.


शिरभावी (ता. सांगोला) येथील एका ७० वर्षीय वृद्धावर आजारपणामुळे पुण्यात ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला. श्वसनविकार व न्यूमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले गेले. त्यानंतर मुलगा बबलू कांबळे याने एका महिला नातेवाईकासह भाडोत्री वाहनातून वडिलांचा मृतदेह शिरभावी गावात आणला. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी, संचारबंदी तथा जिल्हाबंदी असतानाही मृतदेह पुण्याहून कसा आणला, याबद्दल गावकऱ्यांनी आक्षेप घेत गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यविधी उरकण्यास विरोध केला. 


अवघ्या गावाने केवळ करोना संसर्गाच्या भीतीने मृताच्या कुटुंबीयांवर बहिष्कार घातला. त्यानंतर मृतावर त्याच्या मुलाने आपल्या नातेवाईक महिलेच्या मदतीने शेतात अंत्यसंस्कार केले. अंत्यविधी उरकल्यानंतरही गावकऱ्यांनी मृताच्या मुलाला आणि त्याच्या नातेवाईक महिलेला गावात येण्यास पुन्हा विरोध केला. दरम्यान, ही बाब समजल्यानंतर गावात पोलीस धावून आले. गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही.


अखेर मृताच्या मुलासह संबंधित नातेवाईक महिलेची सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

-----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment