तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ? महाविकास आघाडीचा 'प्लॅन बी' तयार - Mangalwedha Times

Breaking

Sunday, April 26, 2020

तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ? महाविकास आघाडीचा 'प्लॅन बी' तयार


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाचं संकट असताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कॅबिनेटने उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र राज्यपालांकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.एकीकडे, राज्यपालांकडून उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीला हिरवा कंदील न मिळाल्याने पेच निर्माण झाला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रकरणी धक्कादायक आरोप केला . 'आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे, उगीच आम्हाला कशाला बोल लावता?' असा गंभीर आरोप त्यांनी केला. मात्र आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहावेत यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून प्लॅन बी तयार केला आहे.काय आहे महाविकास आघाडीचा प्लॅन बी?

राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांची आमदारकीसाठी नियुक्त न केल्यास महाविकास आघाडीकडून प्लॅन बी चा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. या प्लॅननुसार उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर तिन्ही पक्षाचे गटनेते समर्थन पत्र घेऊन राज्यपालांची भेट घेतील आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करतील. त्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. अशा प्रकारचा प्लॅन महाविकास आघाडीकडून आखला जाण्याची शक्यता आहे.


कसा निर्माण झाला पेच?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर 6 महिने राहता येतं. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे.


कोरोना संकटामुळे महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांवरील निवडणुका तहकूब करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्याची शिफारस 6 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाकडून करण्यात आली होती. पण त्यावर अद्याप राज्यपालांनी कोणताही निर्णय दिलेला नाही.

---------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment