बाहेरून येणार्‍याला आश्रय देणार्‍यावर गुन्हे दाखल करणार ; मुख्याधिकारी पाटील यांचा इशारा - Mangalwedha Times

Breaking

Monday, April 27, 2020

बाहेरून येणार्‍याला आश्रय देणार्‍यावर गुन्हे दाखल करणार ; मुख्याधिकारी पाटील यांचा इशारामंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा शहरात गेली तीन दिवस पुकारलेल्या जनता कर्फ्यूला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यापुढेही लॉकडाऊन कालावधीत असाच नागरिकांनी प्रतिसाद देवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करून जे नागरिक  व पै पाहूणे बाहेरून शहरात येतील व त्यांना जे आश्रय देतील त्या दोघांवरही गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिला आहे.


मंगळवेढा शहरात नगरपालिकेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सलग तीन दिवस जनता कर्फ्यू पुकारला होता. या जनता कर्फ्यूला शहरातील नागरिक व लगत असलेल्या दामाजी नगर व चोखामेळा नगर या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तीन दिवस शहरामध्ये एकही दुकान न उघडता व्यापार्‍यांनीही सहकार्य केले. मुख्यमंत्री यांनी 3 मे पर्यत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या दरम्यान अजूनही नागरिकांनी आपल्या घरीच राहून सहकार्य करणे अपेक्षित आहे.


नगरपालिका,लगतच्या दोन ग्रामपंचायतीने किराणा बाजार खरेदीला जाण्यासाठी सप्तरंगी पास कुटुंबियांना दिले आहेत.या पासची अंमलबजावणी मंगळवार दि.28 पासून होणार आहे.शहरातील जवळपास 4600 कुटुंबांना पास वाटप करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या पासवर वार, सदर कुटुंब सदस्याचा फोटो वेळ नमूद करून तशा नोंदी नगरपालिकेने रजिस्टरला घेतल्या आहेत.या नोंदीमुळे पासच्या गैरप्रकाराला अटकाव होणार आहे.


सात दिवस पासाचे रंग पुढीलप्रमाणे सोमवार-गुलाबी रंग,मंगळवार- पिवळा,बुधवार-निळा,गुरुवार-तांबडा,शुक्रवार -हिरवा,शनिवार- नारंगी,रविवार-पांढरा असा रंगाचा क्रम ठरवून दिला असून कुटुंबातील सदस्यांनी ठरवून दिलेल्या दिवशीच किराणा माल खरेदीस जावयाचे आहे. अचानक काही अडचण उदभवल्यास शेजार धर्म म्हणून शेजार्‍यांनी एकमेकास मदत करणे अपेक्षित आहे.

व्यापारी,नागरिक यांनी तीन दिवस जनता कर्फ्यूला  चांगला प्रतिसाद देवून सहकार्य  केले. यापुढेही लॉकडाऊन् कालावधीत सर्वानी असेच सहकार्य करावे.किराणा बाजार खरेदीसाठी ठरवून दिलेल्या दिवशीच खरेदीसाठी बाहेर पडावे अन्य व्यक्तीने विनाकारण बाहेर येवून गर्दी करू नये.प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घेवून मास्क वापरणे गरजेचे आहे.-अजित जगताप,न.पा.पक्षनेता,मंगळवेढा नगरपरिषद


-----------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment