मुंबईची चिंता आणखी वाढली, नऊ वार्डमध्ये कोरोनाचे २०० पेक्षा जास्त रुग्ण - Mangalwedha Times

Breaking

Friday, April 24, 2020

मुंबईची चिंता आणखी वाढली, नऊ वार्डमध्ये कोरोनाचे २०० पेक्षा जास्त रुग्ण


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाशी लढताना आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहे. चाचण्या केल्या जात आहेत, सर्वेक्षण होत आहे. आयसोलेशन आणि क्वारंटाईन केले जात आहे, असे असताना मुंबईच्या चिंतेत भर पडत आहे. शहरातील नऊ वार्डमध्ये तब्बल २०० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण शहरातील विविध भागातील असल्याने चिंता वाढली आहे. भायखळा, वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला,  चेंबूर, गोवंडी, अंधेरी आदी परिसरातील आहेत.


मुंबईतील नऊ वॉर्डमध्ये २०० पेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण तर १०० पेक्षा जास्त रुग्ण असलेले एकूण वॉर्ड १६ आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला अधिक सर्तक राहावे लागणार आहे. मुंबईतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक भाग सील करावे लागणार आहेत. मुंबईकरांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तर दुसरीकडे प्लाझ्मा थेरपीनुसार मुंबईत उपचाराचा प्रयोग केला जाणार आहे. जे रुग्ण बरे झालेत त्यांचे रक्तद्राव घेऊन ते कोरोनाच्या गंभीर रुग्णांना देऊन त्यांच्यामध्ये ॲण्टीबॉडीज वाढविण्याचे काम करतील, असे ते म्हणालेत.


दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. ही बाब चांगली असली तरी मुंबईत कोरोनाचा फैलाव कायम आहे. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी बुधवारी सांगितले. मात्र, आज मुंबईत हॉटस्पॉट वगळता अन्य ठिकाणी रुग्ण आढळले आहेत.

No comments:

Post a Comment