Lockdown : दुचाकीवर डबलसीट फिरताना आढळल्यास होणार कारवाई - Mangalwedha Times

Breaking

Thursday, April 23, 2020

Lockdown : दुचाकीवर डबलसीट फिरताना आढळल्यास होणार कारवाई

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना या संसर्गजन्य आजाराला अटकाव करण्यासाठी शहर हद्दीत लॉकडाऊन जाहिर करूनही नागरिक या ना त्या कारणाने रस्त्यावर येत असल्यामुळे याला रोखण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सात दिवस सात रंगाचे कुटुंबियांना खरेदीसाठी कार्ड देवून प्रत्येक कुटुंबातील एकाच व्यक्तीने खरेदीसाठी आठवडयातून बाहेर पडण्याचा पॅटर्न राबविला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.


कोरोना संसर्गजन्य आजार दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांमध्ये भर पडत आहे. परिणामी चिंताजनक परिस्थिती होत असल्याने मंगळवेढा नगरपरिषदेने रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी एक नवखा प्रयोग अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.


मंगळवेढा शहरात 20 हजार 467 नागरिक असून 4500 कुटुंबे आहेत.या प्रत्येक  कुटुंबियांना वेगवेगळया सात रंगाचे कार्ड दिले जाणार आहे. या कार्डावर कुटुंबातील एका सदस्याचे नाव व त्याचा फोटो चिटकविण्यात येणार आहे हे कार्ड कुटुंबातील सदस्यांनी आठवडयातील ज्या दिवशी रंगाचा वार ठरला आहे त्याच दिवशी किराणा खरेदीसाठी बाहेर पडावयाचे आहे अन्यथा नगरपालिका प्रशासनाकडून बाहेर पडणारा व किराणा दुकानदार या दोघांवरही कारवाई करण्याचा इशारा न.पा.प्रशासनाने दिला आहे.


मंगळवेढा शहरालगत असलेल्या दामाजी नगर व चोखामेळा नगर या दोन ग्रामपंचायतीमध्येही असाच पॅटर्न राबविला जाणार असल्यामुळे शहर परिसरातून शहरात येण्यास अटकाव होणार आहे.ग्राहकांनी सात दिवसाची लिस्ट करूनच बाजारसाठी घराच्या बाहेर पडावयाचे आहे.


किराणा दुकानदारांना खरेदीसाठी आलेल्या प्रत्येक ग्राहकांचे नाव,पत्ता,मोबाईल क्रमांक लिखीत स्वरूपात ठेवण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत.किराणा दुकानदाराने फलकावर प्रत्येक वस्तूंचे रास्त दर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.खरेदीसाठी जाताना पासधारकाने मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्सींग पाळणे महत्वाचे आहे.
पासचे इतर कुटुंबास परस्पर हस्तांतरण केल्याचे निदर्शनास आलेस संंबंधितांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर येणार्‍या व्यक्तीने पायी जावयाचे आहे.शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी 6.00 ते दुपारी 2.00 या वेळेतच दुकानदारांनी आपली दुकाने उघडून ग्राहकांना सेवा दयावयाची आहे.शक्यतो ग्राहकांनी इतरत्र न जाता घराजवळ असलेल्या दुकानातूनच खरेदी करावी.खरेदीस बाहेर पडताना आधार कार्ड अथवा ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे.


नगरपरिषद अधिकारी तसेच पोलिस अधिकारी यांनी मागणी केल्यास ओळखपत्र दाखवावे.सदरचा पास हा नगरपरिषद हद्दीपुरताच नेमून दिलेल्या दिवशीच वैध असेल.कामाव्यतिरिक्त घराबाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.


मेडिकलवाल्यांना ग्राहकांची नोंद ठेवणे बंधनकारक

मंगळवेढा शहरात 37 मेडिकल औषध दुकानदार असून यांना नगरपरिषदेने प्रत्येक ग्राहकाचे नाव,मोबाईल क्रमांक,पत्ता लिखीत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.मेडिकल दुकानासमोर दोन व्यक्तींमध्ये परस्परांपासून किमान 3 फुटांचे सुरक्षीत अंतर राहिल याबाबत दक्षता घ्यावी.ग्राहकांनी मास्क न लावल्यास संबंधित मेडिकल दुकानदारावर आपत्ती व्यवस्थापन कायदयांतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा नोटीसव्दारे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिला आहे. 

अन्यथा कारवाई केली जाईल

मंगळवेढा शहरामध्ये दुचाकीवर एकापेक्षा अधिक बसून फिरल्यास अथवा चारचाकीमध्ये चालक व अन्य एका व्यक्तीस परवानगी असून त्या व्यक्तीने चालकाचे शेजारी न बसता पाठीमागे बसले पाहिजे.वाहनामध्ये बसताना सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक आहे.अन्यथा कारवाई केली जाईल. - जोतीराम गुंजवटे,पोलिस निरिक्षक,मंगळवेढा.

-----------------------
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

No comments:

Post a Comment